


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न विधानपरिषदेत गाजला. आमदार एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत जळगाव जिल्ह्यासह राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मागील दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याने थकीत मानधन अदा करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.
आमदार एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, केंद्र शासनाचा निधी वेळेवर प्राप्त न झाल्याने आणि निधी वितरण प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नियमित मानधन मिळाले नव्हते. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील सुमारे ७,८०० अंगणवाडी सेविका व मदतनीस मागील दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले. यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘SNA SPARSH’ या नवीन निधी वितरण प्रणालीच्या अंमलबजावणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मानधन वितरण प्रक्रियेत विलंब झाला. मात्र, संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शातील डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीतील थकीत मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला व बालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांचे मानधन वेळेवर मिळणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. शासनाने भविष्यात अशा प्रकारचा विलंब होणार नाही, यासाठी निधी वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिल्याचेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न सभागृहात उपस्थित झाल्यानंतर शासनाने थकीत रक्कम अदा झाल्याची माहिती दिल्याने राज्यातील हजारो सेविका आणि मदतनीसांना दिलासा मिळाला आहे. नियमित मानधन वितरणाची व्यवस्था कायम ठेवण्याची अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.



