Home क्राईम इलेक्ट्रिक बाइक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग ; Li-ion बॅटरी पेटल्याने खळबळ

इलेक्ट्रिक बाइक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग ; Li-ion बॅटरी पेटल्याने खळबळ

0
5


जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील  शिव कॉलनी परिसरातील एका इलेक्ट्रिक बाइक सर्व्हिसिंग सेंटरला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगदरम्यान Li-ion बॅटरीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या २० मिनिटांत आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शुक्रवारी (३ जुलै) दुपारी सुमारे २.५९ वाजता शिव कॉलनीतील गुरुकृपा क्लासेसजवळ असलेल्या गुंजन अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील ‘परिवर्तन इलेक्ट्रिक बाइक सर्व्हिसिंग सेंटर’ या दुकानाला अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग सुरू असताना Li-ion बॅटरीमध्ये बिघाड होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे दुकानातील इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वापरल्या जाणाऱ्या Li-ion बॅटऱ्या तसेच सर्व्हिसिंगसाठी लागणारे विविध साहित्य जळून खाक झाले. बॅटरीची आग असल्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. सुरुवातीला पाण्याचा मारा करून त्यानंतर फोमचा वापर करत अग्निशमन दलाने आगीवर प्रभावी नियंत्रण मिळवले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन फायर फायटर गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यापैकी दोन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे काम करण्यात आले. दुकान तळमजल्यावर असल्याने वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या घरातील एलपीजी सिलेंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. योग्य वेळी खबरदारी घेतल्यामुळे आणि फोमचा प्रभावी वापर केल्यामुळे केवळ २० मिनिटांत आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेतील दुकानाचे मालक निखिल संजय जाधव असून, इमारतीच्या मालक सौ. संगीता राजेंद्र पाटील आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, उप अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रभाकर पाटील, गोविंद सोनवणे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, रजनीश भावसार, सत्तार तडवी, सुमित साबळे, यश मनोरे, नवल शंकरपाळ, ललित पाटील, दीपक रांधडे, रितेश उबाळे, वृषभ सुरवाडे आणि रवींद्र सपकाळे यांनी यशस्वीपणे पार पाडली. वेळेत मिळालेली माहिती, अग्निशमन दलाची तत्परता आणि योग्य तांत्रिक पद्धतीने करण्यात आलेल्या बचावकार्यातून संभाव्य मोठी दुर्घटना टळली. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगदरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा या घटनेतून जाणीव झाली आहे.


Protected Content

Play sound