Home Cities अमळनेर वाडी संस्थानच्या आगीत मानवतेचा विजय; हिंदू-मुस्लिम ऐक्याने भारावले प.पू. प्रसाद महाराज

वाडी संस्थानच्या आगीत मानवतेचा विजय; हिंदू-मुस्लिम ऐक्याने भारावले प.पू. प्रसाद महाराज

0
13


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून श्रद्धास्थान असलेल्या येथील ऐतिहासिक संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत मंदिराच्या विस्तीर्ण सभामंडपाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या संकटाच्या भीषण क्षणी धर्म, जात आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अमळनेरकरांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व एकोप्यामुळे सामाजिक ऐक्याचे अत्यंत प्रेरणादायी दर्शन घडल्याची कृतज्ञ भावना संस्थानचे गादीपुरुष प.पू. प्रसाद महाराज यांनी व्यक्त केली आहे.

सध्या आषाढी वारीच्या पावन प्रवासात असलेल्या प.पू. प्रसाद महाराजांनी पंढरपूरच्या वाटेवरूनच अमळनेरकरांसाठी एक अत्यंत भावनिक संदेश जारी केला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी, होमगार्ड, नगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाडी संस्थानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भक्तगण, सेवेकरी आणि हजारो नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अमळनेरसह पारोळा, चोपडा, शिरपूर येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि खासगी पाणी पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांनी जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवले. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महाराजांनी सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच मंदिराच्या ऐतिहासिक पुनर्बांधणीसाठी शासन दरबारी तातडीने पाठपुरावा सुरू करणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले असून, हाच एकोपा भविष्यातही कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

या भीषण आगीत वाडी संस्थानच्या लाकडी कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक सभामंडपाचे अतोनात नुकसान झाले असले, तरी मुख्य गाभाऱ्यातील प्राचीन देवमूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहिल्या आहेत. आग गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने भाविकांनी याला ईश्वरी चमत्कार आणि मोठी कृपा मानली आहे. ‘सभामंडपातील बरेच काही जळाले, पण आमचे आराध्य दैवत शाबूत राहिले; यापेक्षा मोठी भगवंताची कृपा कोणती असू शकते?’ अशी डोळ्यात पाणी आणणारी भावना अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी व्यक्त केली. वाडी संस्थानवर एवढे मोठे संकट कोसळले तरीही प.पू. प्रसाद महाराजांनी आपली आषाढी वारी अर्धवट सोडलेली नाही. ‘आधी पांडुरंग’ हीच संत सखाराम महाराजांची परंपरा कायम ठेवत त्यांनी दिंडीचा प्रवास अखंड सुरू ठेवला आहे. यापूर्वी स्वतःच्या मातोश्रींच्या निधनाच्या अत्यंत दुःखाच्या प्रसंगीही त्यांनी वारी सोडली नव्हती. विठ्ठल भक्तीपुढे वैयक्तिक दुःख, मोह-माया आणि संकटे नेहमीच दुय्यम ठरतात, ही संतपरंपरेची थोर शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा समाजासमोर अधोरेखित केली आहे.

वाडी संस्थानला आग लागल्याचे कळताच अमळनेरकरांनी दाखवलेला एकोपा हा आपल्यासाठी खूप मोठा मानसिक आधार असल्याचे प.पू. प्रसाद महाराजांनी सांगितले. हिंदू-मुस्लिम बांधवांनी हातात हात घालून, स्वतःचा जीव धोक्यात घालून मंदिर वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न हे अमळनेरच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे. प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि मदतीला धावून आलेल्या प्रत्येक नागरिकाला आशीर्वाद देताना महाराज म्हणाले की, ‘तुमच्या या अभूतपूर्व एकोप्यामुळेच माझी वारी आता निर्धास्तपणे सुरू आहे. तुम्ही सर्व पाठीशी आहात, त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. मंदिराची भव्य पुनर्बांधणी देखील आपल्या सर्वांच्या याच एकजुटीतून नक्कीच उभी राहील.’


Protected Content

Play sound