Home क्राईम मोटारसायकल चोरीप्रकरणी आरोपी अटकेत ; स्प्लेंडर जप्त

मोटारसायकल चोरीप्रकरणी आरोपी अटकेत ; स्प्लेंडर जप्त

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली सुमारे २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्तगीर अल्लाउद्दीन पिंजारी (वय ४३, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २९ जूनच्या रात्री ते ३० जूनच्या पहाटेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच-१९-बीसी-५१६२ क्रमांकाची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. त्याचबरोबर परिसरातील एका भंगार खरेदी-विक्री दुकानाचे शटर उचकावून सुमारे ६,३०० रुपये किमतीचे पितळाचे तुकडे व इतर साहित्यही चोरीस गेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला.

तपासादरम्यान शाहरुख खान लीम खान (वय २६, रा. इंद्रप्रस्थ नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश पाटील, प्रमोद लांडगेसरी आणि पोलीस नाईक मोतीलाल बोरसे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Protected Content

Play sound