Home आरोग्य महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया

महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी ४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून तब्बल ३.५ किलो वजनाची मोठी गाठ यशस्वीरित्या काढून तिचे प्राण वाचविले. वेळेवर निदान आणि तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे सध्या महिलेची प्रकृती चांगली असून ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

जळगाव तालुक्यातील संबंधित महिला गेल्या काही महिन्यांपासून सतत पोटदुखी, पोटात जडपणा, दबाव जाणवणे आणि अनियमित रक्तस्त्राव या त्रासांनी त्रस्त होती. त्रास वाढल्यानंतर तिने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार घेतले. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तपासणी केली. सोनोग्राफी व रक्ततपासणीनंतर गर्भपिशवीमध्ये सुमारे २० बाय २० सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ तसेच इतर लहान गाठी असल्याचे निदान झाले.

गाठीचा आकार मोठा असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. ऐश्वर्या चलवदे यांच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करून ३.५ किलो वजनाची गाठ तसेच इतर गाठींसह गर्भपिशवी यशस्वीरित्या काढली. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

डॉ. प्राजक्ता पाटील यांनी महिलांना पोटदुखी, पोट फुगणे, पोटात जडपणा किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन केले. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे गंभीर आजारांवरही यशस्वी उपचार शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 


Protected Content

Play sound