


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यपुरस्कृत विविध आवास योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या अपूर्ण घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आढावा बैठका सुरू असून, जामनेर पंचायत समितीत झालेल्या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी ग्रामपंचायत यंत्रणेला मिशन मोडवर काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
शुक्रवारी (३ जुलै) जामनेर पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-१ व टप्पा-२) तसेच राज्यपुरस्कृत रमाई, शबरी आणि मोदी आवास योजनांतील प्रलंबित व अपूर्ण घरकुलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून प्रत्येक घरकुल निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आर. एस. लोखंडे यांनी दिले.
बैठकीत केवळ घरकुल योजनाच नव्हे, तर ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा नियोजनबद्ध वापर, घरपट्टी व पाणीपट्टी करवसुली, सन २०२६-२७ मधील कर संकलन, ५, १० आणि १५ टक्के निधीचा वापर, प्रलंबित लेखापरीक्षण शंकांची पूर्तता, मनरेगा अंतर्गत कामे, ग्रामपंचायत दप्तराचे डिजिटायझेशन, MAHA-IT अंतर्गत प्रलंबित कामे, अंगणवाड्यांना वीज व गॅस सुविधा, वृक्षलागवड आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायत स्तरावरील अपूर्ण विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बैठकीला तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत घरकुलाचा लाभ मिळावा आणि ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये काम सुरू केले असून, प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.



