Home Cities जळगाव जळगाव मनपाचे २३६८ गाळेधारक, फेरीवाला धोरण अन् नोकरभरती; आमदार सुरेश भोळे यांनी...

जळगाव मनपाचे २३६८ गाळेधारक, फेरीवाला धोरण अन् नोकरभरती; आमदार सुरेश भोळे यांनी अधिवेशनात मांडला औचित्याचा मुद्दा

0
14


मुंबई/जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आज जळगाव शहरातील अत्यंत महत्त्वाचे व जनहिताचे प्रलंबित प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात अत्यंत प्रभावीपणे उपस्थित केले. जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी आणि मनपातील रिक्त पदांची नोकरभरती या तीन प्रमुख विषयांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

आमदार राजूमामा भोळे यांनी सभागृहात बोलताना स्पष्ट केले की, जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न सन २०१२ पासून रेडीरेकनर दर निश्चितीच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहे. हा प्रश्न हजारो व्यापाऱ्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेशी थेट जोडलेला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मनपा प्रशासनाला आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. नगर विकास विभागानेही त्यानुसार पुढील कार्यवाहीचे संकेत दिले असताना, जळगाव महानगरपालिकेकडून अद्यापही हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही. मनपाच्या या दिरंगाईमुळे गाळेधारकांचा प्रश्न रखडला असून, मनपाने हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. गाळेधारकांच्या प्रश्नासोबतच आमदार भोळे यांनी जळगाव शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही सभागृहात मांडला. शहरातील फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, पात्र फेरीवाल्यांचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण व नोंदणी करणे, तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘व्हेंडिंग झोन’ विकसित करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहरात चालणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांच्या कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा येत असल्याने, त्यांना नियोजित व हक्काची जागा उपलब्ध करून देणे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील प्रशासकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकताना आमदार भोळे यांनी जळगाव महानगरपालिकेतील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. मनपा प्रशासनात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे शहरातील दैनंदिन नागरी सुविधा आणि विकासकामांवर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, शासनाने या सर्व रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन मनपा संवर्गातील नोकरभरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे हे सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत शासन स्तरावर आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील, अशी ग्वाही आमदार राजूमामा भोळे यांनी याप्रसंगी दिली.


Protected Content

Play sound