


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, घरासमोरील विहिरीत डोकावत असताना तोल जाऊन पडलेल्या २० वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिरसाड गावात हळहळ व्यक्त केली जात असून, यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाड (ता. यावल) येथील राजेश रमेश भिलाला (वय २०) हा मंगळवारी आपल्या घरासमोरील विहिरीजवळ गेला होता. यावेळी विहिरीत डोकावत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट विहिरीत पडला. घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने राजेशला विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने भिलाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रमेश भिलाला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहित गणेश करीत आहेत.



