Home Cities जळगाव अहिल्यादेवींच्या विचारांची मशाल घेऊन निघणार ‘अहिल्या संदेश यात्रा’; समाजबांधवांना आवाहन

अहिल्यादेवींच्या विचारांची मशाल घेऊन निघणार ‘अहिल्या संदेश यात्रा’; समाजबांधवांना आवाहन

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने राज्यभर ‘अहिल्या संदेश यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, राष्ट्रप्रेमाचा आणि समाजहिताच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात येणार असून, या उपक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे.

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आष्टा (जि. सांगली) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटन बळकटीकरण, समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा, आगामी सामाजिक उपक्रमांचे नियोजन आणि संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयावर भव्य स्वरूपात ‘अहिल्या संदेश यात्रा’ आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

या यात्रेच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन कौशल्य, जनकल्याणाची भावना, महिला सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आणि समाजहिताचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांना समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अण्णासाहेब डांगे यांनी केले. बैठकीत मार्गदर्शन करताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे, प्रदेशाध्यक्ष चिमणभाऊ डांगे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलका गोडे, माजी महामंत्री सुभाषराव सोनवणे, उपाध्यक्ष शरद वसतकार, सुभाष करे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश निर्मल तसेच जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत संघटन विस्ताराला गती देणे, युवकांचा संघटनेतील सहभाग वाढविणे, महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी उपक्रम राबविणे तसेच सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्याचा प्रसार राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित होणारी ‘अहिल्या संदेश यात्रा’ ही समाजातील एकजूट आणि सामाजिक जागृतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound