


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी यतीश भारंबे याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाद्वारे जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नासा कडून अधिकृत गौरव प्राप्त करत जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे. नासाच्या “असुरक्षितता प्रकटीकरण कार्यक्रम” अंतर्गत त्याच्या कार्याची दखल घेत त्याला अधिकृत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे.
यतीश भारंबे यांनी नासाच्या माहिती सुरक्षा प्रणालीतील संभाव्य सुरक्षेतील त्रुटी शोधून ती जबाबदारीने संबंधित संस्थेकडे नोंदवली. त्यांच्या या संशोधनामुळे नासाच्या माहिती प्रणालीची सुरक्षा अधिक मजबूत करण्यास मदत झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. नासाचे वरिष्ठ एजन्सी माहिती सुरक्षा अधिकारी माईक विट यांनी पाठविलेल्या प्रशंसापत्रात यतीश यांच्या स्वतंत्र सुरक्षा संशोधक म्हणून केलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा हे जागतिक सुरक्षेचे अत्यंत महत्त्वाचे अंग बनले आहे. अशा महत्त्वाच्या क्षेत्रात भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला थेट नासाकडून मिळालेली अधिकृत मान्यता ही केवळ वैयक्तिक यश नसून भारतातील विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेची जागतिक स्तरावर घेतलेली दखल असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यतीश भारंबे यांचे अभिनंदन करत सांगितले की, हे यश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. संशोधन, नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनीही यतीश यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही त्याच्या यशाचे कौतुक केले.
यतीश भारंबे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील सकारात्मक शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण स्व-अभ्यासाला दिले आहे. भविष्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात अधिक संशोधन करून भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधन संस्कृती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवरील क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



