Home Cities जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई ; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई ; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद

0
18


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक केली आहे. विमानतळासमोरील कुरूंबा परिसरातून धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

दि. २८ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जळगाव विमानतळासमोरील कुरूंबा परिसरातून धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये पोहेकॉ रमेश बाबूलाल चौधरी, पोहेकॉ  रामकृष्ण पाटील, पोको किरण पाटील, पोको गणेश ठाकरे, पोको सुभाष साळवे, पोको रमाकांत साळुंखे, पोको राहुल येथे, पोको  नितीन ठाकूर आणि पोको शशिकांत मराठे यांचा समावेश होता.

पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून सापळा रचला असता संशयित इसम पायी फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव गणेश श्रावण सोनवणे (वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कुरूंबा, ता. जि. जळगाव) असे आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची व विसंगत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर अंगझडती घेतली असता त्याच्या जिन्स पँटच्या मागील बाजूस कमरेला खोचलेला गावठी कट्टा मॅगझीनसह आढळून आला.

पोलिसांनी पंचांसमक्ष हा गावठी कट्टा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे २० हजार रुपये आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Protected Content

Play sound