


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात आज दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये एकूण ७८ पोलिओ बूथ उभारण्यात आले असून रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर स्वतंत्र पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. शहरालगतच्या दुर्गम भागांमध्येही दोन मोबाईल टिमच्या माध्यमातून बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे काम सुरू आहे.
या मोहिमेसाठी शहरात एकूण २३४ आरोग्य कर्मचारी आणि १६ सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण १२,९६२ बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून दुपारी १२ वाजेपर्यंत ४३ टक्के म्हणजेच ५,६६१ बालकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मोहिमेदरम्यान रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून शहरातील विविध शैक्षणिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
या मोहिमेला लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका तसेच अमळनेर नगरपरिषदेचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिप गोसावी उपस्थित होते. पल्स पोलिओ मोहिमेमुळे शहरात आरोग्यविषयक जनजागृती वाढत असून प्रत्येक बालकाला पोलिओमुक्त भवितव्य मिळावे यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्था एकत्रितपणे काम करत असल्याचे चित्र दिसून आले.



