Home आरोग्य फैजपूर शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ 

फैजपूर शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ 

0
76

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर शहरात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध पोलिओ बूथवर ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा श्रीमती दामिनीताई सराफ आणि नगरसेवक पवनभाऊ सराफ यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमास आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सय्यद, पोलिओ पर्यवेक्षक चंदन पाटील, श्री अशोक चौधरी, श्री राजेश कोळी, आरोग्य सेविका सौ. आरती पाटील, सौ. अलका वैदकर तसेच नगरपरिषद कर्मचारी सौ. सविता काटे आणि श्री सागर सपकाळे यांच्यासह आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फैजपूर शहरातील सर्व पोलिओ बूथवर आज ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीचे दोन थेंब देण्यात येत आहेत. प्रत्येक बालक पोलिओमुक्त राहावा यासाठी पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या बूथवर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पल्स पोलिओ मोहिमेमुळे बालकांच्या आरोग्य सुरक्षेला मोठा आधार मिळत असून फैजपूर शहरातील नागरिकांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले.


Protected Content

Play sound