फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला फैजपूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. तहानगर येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे आयोजित पोलिओ बूथवर प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांच्या हस्ते ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
फैजपूर शहरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सय्यद, पोलिओ पर्यवेक्षक चंदन पाटील, राजेश कोळी, विवेक इंगळे, दिनेश महाजन, अंगणवाडी सेविका मालती कोल्हे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येत आहेत. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील मुलांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. आरोग्य विभागाने “दोन थेंब जीवनाचे, पोलिओमुक्त भारताचे” हा संदेश देत नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. सर्वांच्या सहकार्याने पोलिओमुक्त समाज निर्माण करण्याचा प्रशासनाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



