


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेचे शुक्रवारी, दि. २६ जून रोजी संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानाचे गादीपती प. पू. प्रसाद महाराज यांच्या हस्ते पाहणी करण्यात आली. नव्याने विकसित करण्यात आलेल्या रोपवाटिकेतील विविध विभाग, परिसराचे सुशोभीकरण आणि निसर्ग बैठक स्थळाचे नियोजन पाहून त्यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील या रोपवाटिकेला प. पू. प्रसाद महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी रोपवाटिकेत तयार करण्यात आलेले विविध विभाग, पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. या उपक्रमामुळे अध्यात्मासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत त्यांनी संस्थेला शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांच्या सहकार्याने गेल्या २० वर्षांपासून या रोपवाटिकेचे संगोपन करण्यात येत आहे. मात्र, रोपवाटिकेला अधिक व्यापक आणि आकर्षक स्वरूप देण्याच्या उद्देशाने नुकतेच तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नवीन स्वरूपात विकसित करण्यात आलेल्या संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुलझाडे, शोभिवंत वृक्ष, फळझाडे तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. भाविकांना मंदिर दर्शनासोबत निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा आणि अध्यात्मिक अनुभवाचा आनंद घेता यावा, यासाठी परिसराचे आकर्षक नियोजन करण्यात आले आहे.
प. पू. प्रसाद महाराज यांनी रोपवाटिकेतील विविध विभागांची पाहणी करून त्यामागील संकल्पना जाणून घेतली. मंदिर परिसरातील हरित उपक्रम, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी प. पू. प्रसाद महाराज यांनी श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचे पाद्यपूजन करून स्वागत करण्यात आले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, हेमंत गोसावी आणि पवन शर्मा यांनी पौरोहित्य केले.
यावेळी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानातील सुदाम पाटील महाराज, हर्षल जोशी महाराज, सारंग पाठक, मंगळ सेवेकरी आर. टी. पाटील, ए. डी. भदाणे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोपवाटिकेच्या नूतनीकरणामध्ये गांडूळ खत प्रकल्प, गोवरी निर्मिती, प्लास्टिक क्रशिंग विभाग, गुलाब बाग, वृक्षारोपण विभाग, जैविक खत प्रणाली आदी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय रोपवाटिकेजवळच भाविकांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता यावा यासाठी निसर्ग बैठक स्थळ तयार करण्यात आले असून, विविध वृक्षराजींनी हा परिसर सजविण्यात आला आहे.



