


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पोलिसांच्या समयसूचकता आणि दक्षतेमुळे एका गंभीर प्रसंगाला वेळीच आळा बसला आहे. यावल शहराजवळील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावर करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका ट्रकमधून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. यामध्ये १७ वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलगी असून, दोघेही प्रेमीयुगल असल्याचे सांगत होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप आपल्या पालकांकडे परत पोहोचली आहे.
चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या मार्गावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस हवालदार एजाज सलीम गवळी, पोलीस हवालदार अर्शद कासम गवळी, गृहरक्षक दलाचे वरिष्ठ फलटण नायक पंकज फिरके आणि पोलीस वाहन चालक ज्ञानेश्वर सपकाळे हे कर्तव्यावर होते. नाकाबंदी दरम्यान ट्रक क्रमांक जीजे-१० टीव्ही-७३२३ हा भरधाव वेगाने यावल शहराच्या दिशेने येताना दिसून आला. पोलिसांनी ट्रक थांबवून चालकाची चौकशी केली असता चालक अमोल शंकर जयप्रकाश पांडे (रा. भगवानपूर, बिहार) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. तसेच तो पोलिसांना संशयास्पद उत्तरे देत होता.
ट्रकमध्ये कोणीही नसल्याचे चालक सांगत असतानाच पोलिसांना त्याच्या बोलण्यात संशय आल्याने त्यांनी सतर्कता दाखवत वाहनाची तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील उपरखेड येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अभनपूरा बुद्रुक येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आढळून आली. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांसह ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. गुरुवार, दि. २५ जून रोजी मुलीचे आई-वडील यावल पोलीस ठाण्यात दाखल झाले असता, पोलिसांनी आवश्यक कार्यवाही करून अल्पवयीन मुलीला सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. मुलगी सुरक्षित परत मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी यावल पोलिसांचे आभार मानले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहत होती. मावशीचे कुटुंब चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ऊस तोडणीसाठी गेले होते. त्याच ठिकाणी उपरखेड येथील १७ वर्षीय मुलगा देखील कुटुंबासह ऊस तोडणीसाठी आला होता. तेथे दोघांची ओळख झाली होती. दि. २३ जून रोजी संबंधित मुलगा अभनपूरा बुद्रुक येथे गेला होता. त्यानंतर दोघे शिरपूर येथे आले आणि तेथून ट्रकमधून भुसावळकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना यावल पोलिसांच्या नाकाबंदीत आढळून आले. दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने तसेच ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत योग्य ती कार्यवाही केली असून, अल्पवयीन मुलालाही त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यावल पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एका संवेदनशील प्रकरणात योग्य वेळी हस्तक्षेप झाला असून, पोलिसांच्या दक्षतेचे परिसरातून कौतुक होत आहे.



