


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल आणि थोरगव्हाण परिसरात २४ जून रोजी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून, नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान, महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
थोरगव्हाण येथील शेतकरी गजानन गोकुळ चौधरी यांच्या मनवेल शिवारातील गट क्रमांक १७२ मधील शेतात सुमारे दोन हजार केळीची झाडे लावण्यात आली होती. मात्र, २४ जूनच्या रात्री झालेल्या वादळी पावसाने या केळी बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा तडाखा इतका जोरदार होता की, अनेक केळीची झाडे उन्मळून पडली आहेत.
या नुकसानीची माहिती मिळताच मनवेल तलाठी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असून, नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांचे नुकसान झाल्याने प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वादळामुळे पडलेल्या केळीच्या झाडांवरील घड अद्याप विक्रीयोग्य तयार झालेले नसल्याने ते शेतकऱ्यांना फेकून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आधीच लागवडीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
नुकसान झालेल्या केळी बागांची साफसफाई करणे हे देखील शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक आव्हान बनले आहे. पडलेल्या केळी खांबांचे वजनदार खोड असल्याने त्यांचे तीन तुकडे करून विल्हेवाट लावावी लागणार आहे. तसेच पाने काढणे, ठिबक सिंचन संच व पाईप काढणे आणि नवीन पीक लागवडीसाठी पुन्हा तयारी करावी लागणार आहे. या सर्व कामांसाठी हेक्टरी अंदाजे ६० ते ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे. एवढा मोठा खर्च करायचा कसा, असा प्रश्न नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच परिसरात मजुरांचा तुटवडा असल्याने मजुरीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीतून सावरण्यासाठी त्वरित आर्थिक मदतीची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मनवेल-थोरगव्हाण परिसरातील केळी बागांचे नुकसान हे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक धक्का ठरले असून, महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



