Home Cities चोपडा चोपड्यातून श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान 

चोपड्यातून श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान 

0
14


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र चोपडा ते श्री क्षेत्र पंढरपूर या १७ व्या वार्षिक ‘श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे’ गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात शेकडो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन नामदेव जनाबाई चोखोबाराय वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री कृष्ण मंदिर, हस्ताळकर हॉस्पिटलजवळून दिंडीचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. यावेळी परिसरातील भाविक, वारकरी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याचे मार्गदर्शन ह.भ.प. गोविंद महाराज यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथ महाराज नगरदेवळेकर यांचे सुश्राव्य प्रस्थान कीर्तन संपन्न झाले. त्यांच्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना भक्ती, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा संदेश मिळाला.

दिंडी प्रस्थानावेळी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने पंढरीच्या मार्गावर पाऊल ठेवले. या दिंडी सोहळ्यात ज्ञानेश्वरी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दिंडीमध्ये प्लास्टिक, थर्माकोल आणि ग्लास वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्वच्छता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा विशेष प्रयत्न या सोहळ्यात करण्यात येत आहे.

दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी  संजय मगनशेट जगताप आणि सौ. विजया संजय जगताप (अध्यक्ष, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज संस्था, चोपडा) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. वारकरी परंपरेतील श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेला हा दिंडी सोहळा चोपडा परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला आहे. पुढील प्रवासात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, प्रवचन आणि भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण कायम राहणार आहे.


Protected Content

Play sound