Home धर्म-समाज डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान 

डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान 

0
17


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वारकरी संप्रदायाची खान्देशातील थोर परंपरा लाभलेली वै. डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. खानापूर येथून ज्ञानोबा-तुकाराम नामाचा गजर करत शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

दिंडीच्या प्रस्थानापूर्वी खानापूर येथील श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिरातील मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त किशोर बोरोळे आणि अतुल तळले यांच्या हस्ते वीणा व पताका पूजन करण्यात आले. वै. डिंगम्बर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे नेतृत्व दुर्गादास महाराज नेहेते करीत आहेत. दिंडीतील विणेकरी म्हणून भगवान महाराज चौधरी खानापूरकर, विश्वभर महाराज, अमोल महाराज भंजाळे, एकनाथ महाराज तासखेडकर, गोपाळ महाराज, संजय महाराज विटवेकर यांचे सहकार्य लाभत आहे.

दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यास भास्कर बॉंडे, गणेश पाटील, भूषण नारखेडे, युवराज चोपडे यांच्यासह खानापूर ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकऱ्यांनी दिंडीला निरोप दिला. ही पायी दिंडी खानापूर येथून पुढे चिनावल, रोझोदा, खिरोदा, कलमोडा, बोरखेडा, न्हावी मार्गे हंबर्डी येथे मुक्कामी जाणार आहे. त्यानंतर भुसावळ, खडका, जामनेर, सिल्लोड, जालना, बीड, बार्शी या मार्गाने प्रवास करत तब्बल २३ दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून दिंडी आषाढी यात्रेसाठी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे.

पंढरपूर येथे वै. डिंगम्बर महाराज चिनावलकर मठात दिंडीचा मुक्काम राहणार आहे. प्रवासादरम्यान दररोज श्रीमद् भागवत कथा, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अध्यात्मिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे. वै. डिंगम्बर महाराज चिनावलकर यांनी या दिंडीची स्थापना केली होती. त्यानंतर विठ्ठल महाराज हंबर्डीकर आणि अरुण महाराज बोरखेडेकर यांनी ही परंपरा पुढे चालविली. सध्या ही वारकरी सेवा दुर्गादास महाराज नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे.


Protected Content

Play sound