
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी परिसरातील रामदेव बाबा मंदिर आणि राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर गणेशवाडीत आज दुपारी एक थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. घराच्या पाठीमागे असलेल्या एका बंद विहिरीतून इलेक्ट्रिक मोटर बाहेर काढत असताना सिमेंटचा धापा तुटून विहिरीत कोसळलेल्या रामलाल हिरामण भावसार (वय 91), सिद्धेश महेंद्र भावसार (वय 24) आणि दर्शन राजेंद्र खाचणे (वय 23) यांना अग्निशमन दलाने अत्यंत धाडसी मोहीम राबवून जिवंत बाहेर काढले. स्वतः मुख्य अग्निशमन अधिकारी विहिरीत उतरल्याने या रेस्क्यू ऑपरेशनचे शहरात कौतुक होत आहे.

आज दुपारी साधारण ४:४१ वाजता एन. के. पिंजारी यांनी अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून या भीषण दुर्घटनेची माहिती दिली. गणेशवाडी भागात घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बंद विहिरीवर ठेवलेल्या काँक्रीटच्या धाप्यावर (स्लॅब) उभे राहून आजोबा-नातू व शेजारील एक मुलगा विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर बाहेर काढण्याचे काम करत होते. मात्र, वजनामुळे काँक्रीटचा तो धापा अचानक क्रॅक झाला आणि मोठा आवाज होऊन तिघेही थेट खोल विहिरीत कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये तिघे जण मृत्यूशी झुंज देत असल्याचे पाहताच, मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता स्वतः विहिरीमध्ये उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. विहिरीतील कठीण परिस्थिती आणि अंधाराचा सामना करत, त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. त्यांच्या या तत्परतेमुळे विहिरीत अडकलेल्या तिघांना धीर मिळाला.
अश्वजीत घरडे यांच्यासोबत विहिरीच्या वरून आणि आतून रेस्क्यू टीममधील इतर कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, निवांत इंगळे, फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, सुमित साळवे, यश मनोरे, चेतन सपकाळे, विठ्ठल पाटील आणि ऋषिकेश वाघ आदी जवानांनी दोरखंड आणि स्ट्रेचरच्या साहाय्याने अत्यंत शिताफीने तिघांनाही एक-एक करून विहिरीबाहेर काढले. अग्निशमन दलाच्या या अचूक आणि वेगवान कामगिरीमुळे तिघांचेही प्राण वाचले असून त्यांना सुरक्षितपणे जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.
अग्निशमन दलाच्या या थरारक आणि यशस्वी कामगिरीनंतर संपूर्ण जळगाव शहरातून जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वतः मुख्य अधिकारी अश्वजीत घरडे यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून दाखवलेले शौर्य आणि त्यांच्या टीमने दाखवलेले व्यावसायिक कौशल्य यामुळे तीन कुटुंबांचे संसार उघड्यावर पडण्यापासून वाचले आहेत. नागरिकांनी अग्निशमन दलाच्या या ‘देवदूतांचे’ जाहीर आभार मानले आहेत.



