Home प्रशासन मुक्ताईनगरात अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह ; ठराविक दुकानदारांवरच कारवाईचा आरोप 

मुक्ताईनगरात अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह ; ठराविक दुकानदारांवरच कारवाईचा आरोप 

0
11


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीने शहरातील अतिक्रमणधारकांविरोधात नोटिसा बजावत कारवाईची प्रक्रिया सुरू केली असली, तरी ही कारवाई निवडक दुकानदारांपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक जागांवर अद्यापही अतिक्रमण कायम असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरपंचायतीने बजावलेल्या नोटिसांमध्ये सार्वजनिक जागा तातडीने मोकळ्या करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास नगरपंचायत प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, नोटीस देऊनही अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम असल्याने प्रशासनाच्या कारवाईच्या वेळेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुक्ताईनगर शहरातील अनेक भागांमध्ये दुकाने, टपऱ्या, हातगाड्या आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. भर चौकातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, काही ठराविक व्यावसायिकांवरच कारवाई होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. “अतिक्रमण हटवायचे असेल तर कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे. केवळ काही दुकानदारांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नगरपंचायतीच्या नोटिशीनंतर आता प्रशासन प्रत्यक्षात किती प्रभावी कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक जागा मोकळ्या करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व अतिक्रमणधारकांवर समान कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मुक्ताईनगरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, निवडक कारवाईऐवजी संपूर्ण शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मागणी जोर धरत आहे. आता नगरपंचायत प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Protected Content

Play sound