Home Cities जळगाव ए. टी. झांबरे विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात

ए. टी. झांबरे विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात

0
27


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय विशेष ‘मैत्री शिबिर’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले होते. सोमवार २२ जून ते २३ जून या कालावधीत पार पडलेल्या या शिबिराची आज यशस्वी सांगता झाली असून, यामध्ये शाळेतील एकूण ८३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासोबतच त्यांच्यामध्ये समाजाभिमुख दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या कालावधीत विविध उपक्रम, अभ्यासपूर्ण चर्चासत्रे, नाविन्यपूर्ण खेळ, प्रात्यक्षिके आणि समूहकार्य यांसारख्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शिका मानसी बोडस यांच्या नेतृत्वाखाली सुधा रहाणे, अंजली भिडे, केतकी दीक्षित, भारती गोडबोले आणि सारिका अमळकर यांनी विद्यार्थ्यांना विविध सत्रांमधून अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.

हे शिबिर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले असून, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा लोहार यांचेही याकामी विशेष सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, हे शिबिर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होण्यास मोठी मदत होते.

शिबिरामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांसमोर ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्याव्रत’ ही संकल्पना मांडण्यात आली. तसेच ‘स्वयंविकासातून समाजविकास’ ही महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मूल्यांची सखोल ओळख करून देण्यात आली.

या शिबिरातून वक्तशीरपणा, संघभावना, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, समाजात अचानक उद्भवणाऱ्या अडचणींचा धैर्याने सामना करण्याची क्षमता तसेच समाजोपयोगी नागरिक म्हणून स्वतःची भूमिका कशी पार पाडावी, याबाबत विविध कृतींच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांचे तीन विशेष गट तयार करण्यात आले होते. या गटकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना आणि सहकार्याची वृत्ती विकसित करण्यात आली. देश, समाज आणि स्वतःबद्दल जागरूकता निर्माण करून आदर्श व संवेदनशील नागरिक घडविण्याचे कार्य या शिबिरातून प्रभावीपणे साध्य झाले.

या संपूर्ण शिबिराचे नेटके नियोजन दिपाली खडके, प्रतिभा नेहेते आणि रत्नमाला शिंदे यांनी केले. दोन दिवसांच्या शिबिराचे यशस्वी आयोजन, व्यवस्थापन आणि समन्वयासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या सांगता समारंभात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, मनोगते आणि शिबिरातून मिळालेल्या प्रेरणादायी शिकवणींचे कथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नमाला शिंदे यांनी केले.

 


Protected Content

Play sound