Home Cities जळगाव अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी रस्ता अंधारात; पथदिवे सुरू करण्याची काँग्रेसची महापौरांकडे...

अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी रस्ता अंधारात; पथदिवे सुरू करण्याची काँग्रेसची महापौरांकडे मागणी

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ५० टक्क्यांपेक्षा जास्त पथदिवे बंद अवस्थेत असल्याने बहुतांश भाग अंधारात बुडाला आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी महापौर दिपमाला काळे यांना निवेदन देऊन शहरातील पथदिवे तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील पथदिव्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. तक्रार दिल्यानंतर पथदिवे अवघे २ ते ३ दिवस सुरू राहतात आणि पुन्हा १५ ते २० दिवसांसाठी बंद पडतात. या गंभीर समस्येबाबत महानगरपालिकेच्या अभियंत्यांकडे विचारणा केली असता ते महावितरणकडे (एम.एस.ई.बी.) बोट दाखवतात, तर महावितरणचे अभियंता मनपाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सामान्य जळगावकर नागरिकांना मात्र नाहक अंधाराचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या मार्गावर पथदिवेच नसल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. हा रस्ता परिसरातील १० ते १५ कॉलनींमधील नागरिकांच्या मुख्य रहदारीचा मार्ग असून येथे २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. याशिवाय एम.आय.डी.सी. मधील शेकडो कर्मचारी रात्री-अपरात्री याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावरील काशिनाथ चौकात दोन युवकांचा भीषण अपघात झाला आहे. अंधारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री शतपावली करणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेचे अभियंता, महावितरण आणि संबंधित कामाचे ठेकेदार यांना महापौरांनी आपल्या स्तरावरून कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी रस्त्यावर युद्धपातळीवर पथदिवे बसवून शहरातील नागरिकांचे हाल थांबवावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्यासह सलीम इनामदार, अमजद पठाण, विशाल पवार, अनंत परिहार, ज्ञानेश्वर कोळी, चंद्रकांत राजपूत यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जळगाव शहरातील ५० टक्क्यांहून अधिक पथदिवे बंद असल्याच्या आणि अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी दरम्यान पथदिव्यांअभावी होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी महापौर दिपमाला काळे यांना निवेदन देऊन मनपा, महावितरण आणि ठेकेदारांच्या समन्वयाअभावी होणारी नागरिकांची कोंडी फोडण्याची व पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound