Home Cities जळगाव मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय !

मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय !

0
55


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या विधानपरिषद निवडणुकीत जळगावातून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विक्रमी मतांनी विजय झाला असून त्यांनी पहिल्याच फेरीत सरशी मिळवली आहे.

जळगाव विधानपरिषदेची निवडणूक यंदा मोठ्या प्रमाणात गाजली. यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्या महायुतीत ही जागा भाजपला सुटणार की शिवसेनेला ? यावरून मोठा पेच निर्माण झाला होता. यात भारतीय जनता पक्षाला ही जागा मिळाल्यावर उमेदवारी कुणाला मिळणार ? यावरून मोठा खल झाला. अखेर अनेक मातब्बर इच्छुकांना वगळून भाजपच्या वतीने पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनी उमेदवारी दाखल केली. मविआतर्फे शरद तायडे यांना उमेदवारी मिळाल्याने चौरंगी लढत निर्माण झाली.

माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर देखील चार उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली. अखेर रेश्मा कुंदन काळे आणि अनिल चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे शेवटी नंदकिशोर महाजन आणि शरद तायडे यांच्यात लढत झाली. १८ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ९७ टक्के मतदान झाले. यात एकूण ६३० पैकी ६१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, आज म्हणजेच २२ जून रोजी सकाळी आठ वाजेपासून अल्पबचत भवनात मतमोजणी सुरू झाली. ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्यामुळे मतपत्रीकांची मोजणी करण्यात आली.

आजच्या मतमोजणीत प्रारंभीपासूनच नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली, आणि त्यांना पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. त्यांना तब्बल ५८२ मते मिळाली हे विशेष ! यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय संपादन केला असून महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. तर महाजन यांनी विजय संपादन केला असला तरी थोड्या वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.


Protected Content

Play sound