Home Cities अमळनेर महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर अमळनेरचे वेदांशू पाटील ; डॉ. डिगंबर महाले यांची...

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर अमळनेरचे वेदांशू पाटील ; डॉ. डिगंबर महाले यांची गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड

0
15


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी आणि उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) च्या व्यवस्थापन समितीवर अमळनेर येथील युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ही नियुक्ती केली असून, संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात झालेल्या या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची देखील महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. महाले यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आणि दीर्घकालीन योगदान लक्षात घेऊन यापूर्वी त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्त होणारे ते अमळनेर तालुक्याच्या इतिहासातील पहिले सदस्य ठरले होते.

महाराष्ट्र चेंबरची व्यवस्थापन समिती ही संस्थेतील सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी समिती मानली जाते. या समितीत अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, विविध विभागांचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आणि सेक्रेटरी जनरल यांचा समावेश असतो. संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणे आणि संस्थेची भावी दिशा निश्चित करणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असते. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्षांच्या विशेष अधिकारातून व्यवस्थापन समितीवर केवळ एका सदस्याची नियुक्ती केली जाते. यंदा ही महत्त्वाची जबाबदारी वेदांशू पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, शिक्षण, मनोरंजन आणि ई-कॉमर्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले वेदांशू पाटील हे युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा व्यवसाय क्षेत्रातील अनुभव, संघटन कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात व्यवस्थापन समितीवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये वेदांशू पाटील हे सर्वात तरुण सदस्य ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे उद्योग आणि व्यापारी क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या २०२६-२८ या कालावधीच्या निवडणुकीत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राज्यातील विविध उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांपैकी काहींची बिनविरोध तर काहींची निवडणुकीद्वारे निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वासोबत युवा उद्योजकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न म्हणून वेदांशू पाटील यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना वेदांशू पाटील यांनी अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसेच महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नेतृत्वाचे आभार मानले. संस्थेच्या विकासासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि शतक महोत्सवी वर्षात विविध नवीन उपक्रम राबविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वेदांशू पाटील यांच्या नियुक्तीमुळे अमळनेरचे नाव राज्याच्या उद्योग व व्यापार क्षेत्रात अधोरेखित झाले असून, डॉ. डिगंबर महाले यांच्या निवडीमुळे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अमळनेरच्या प्रतिनिधित्वाला आणखी बळ मिळाले आहे.


Protected Content

Play sound