Home क्राईम दहिगावच्या अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

दहिगावच्या अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

0
73

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी आठ दिवस झुंज दिल्यानंतर अखेर गुरुवार, १८ जून रोजी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे दहिगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्येचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मयत शेतकऱ्याचे नाव विश्वास उर्फ पिंटू रामकृष्ण पाटील (वय ४०, रा. दहिगाव, ता. यावल) असे आहे. विश्वास पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे तसेच खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणावर कर्ज होते. कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक अडचणी असह्य झाल्याने त्यांनी ११ जून रोजी सकाळी विषारी पदार्थ प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या आठ दिवसांपासून विश्वास पाटील हे मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर १८ जून रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विश्वास पाटील यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. ते मनोज पाटील आणि ईश्वर पाटील यांचे लहान भाऊ होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दहिगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच बँकांच्या कर्जामध्ये अनेक तरुण शेतकरी थकबाकीदार म्हणून अडकले असल्याचे सांगितले जात आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांवर येणाऱ्या मानसिक आणि आर्थिक संकटाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound