Home Cities जळगाव जळगाव शहरात अतिक्रमणाला लगाम; पिवळ्या पट्ट्याबाहेर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर कारवाईचा इशारा

जळगाव शहरात अतिक्रमणाला लगाम; पिवळ्या पट्ट्याबाहेर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर कारवाईचा इशारा

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाहतूक कोंडी कमी करून बाजारपेठ परिसर शिस्तबद्ध करण्यासाठी महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर आता हॉकर्स आणि पार्किंग व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. पिवळ्या पट्ट्याबाहेर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर थेट जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला.

महापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, घाणेकर चौक ते प्रकाश मेडिकल चौकापर्यंत पायी पाहणी करून परिसराची स्थिती जाणून घेतली. यावेळी उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. हॉकर्ससाठी निश्चित जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी पिवळे पट्टे आखण्यात येणार आहेत. या मर्यादेतच व्यवसाय करणे बंधनकारक राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा परिसरात कोणतेही अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. तसेच वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

दाणाबाजार परिसरातील अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबतही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. बंदीच्या वेळेत येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभागाला पत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्या.याशिवाय परिसरातील स्वच्छतेवरही भर देण्यात आला असून, दुकानदार आणि हॉकर्सना डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

जळगाव शहरातील अतिक्रमण नियंत्रण, वाहतूक सुधारणा आणि स्वच्छतेसाठी मनपाने विशेष मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.


Protected Content

Play sound