Home Cities जळगाव संपूर्ण महाराष्ट्रातून रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची एकमेव निवड 

संपूर्ण महाराष्ट्रातून रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची एकमेव निवड 

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी कामगिरी नुपूर पांडे यांनी केली आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे कला आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘सिनिअर आणि ज्युनिअर फेलोशिप’मध्ये रंगमंचीय (Theater) ज्युनिअर फेलोशिपसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नुपूर पांडे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून कला क्षेत्रातील प्रतिभावान कलाकार, संशोधक आणि साधकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध फेलोशिप प्रदान केल्या जातात. यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होतात. अत्यंत कठोर आणि गुणवत्तापूर्ण निवड प्रक्रियेनंतर तज्ज्ञ समितीकडून अंतिम निवड केली जाते. याच प्रक्रियेत नुपूर पांडे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत राष्ट्रीय स्तरावरील ही प्रतिष्ठित फेलोशिप मिळवली आहे.

दिल्ली येथील सांस्कृतिक क्षेत्रातील उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत फेलोशिपसाठी निवड झालेल्या कलाकारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये शास्त्रीय संगीत, लोककला, पारंपरिक कला, साहित्य, रंगमंच आणि दृश्य कला अशा विविध क्षेत्रांतील निवडक कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी महाराष्ट्रातून केवळ नुपूर पांडे यांच्या नावाची निवड झाली आहे. फेलोशिपच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या कला क्षेत्रात सखोल संशोधन, अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या फेलोशिपमुळे नुपूर पांडे यांना रंगभूमी क्षेत्रातील संशोधन आणि सर्जनशील कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे व्यासपीठ मिळणार आहे.

संस्कृती मंत्रालयाच्या वतीने निवड झालेल्या उमेदवारांना अधिकृत पुरस्कार पत्र आणि पुढील मार्गदर्शक सूचना नवी दिल्ली येथील सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT) मार्फत पाठविण्यात येणार आहेत. या माध्यमातून फेलोशिपच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. नुपूर पांडे यांच्या या यशामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रंगकर्मी, कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित फेलोशिपमध्ये महाराष्ट्रातून जळगावच्या कलाकाराची एकमेव निवड होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.


Protected Content

Play sound