Home Cities जळगाव विधानपरिषद निवडणूक मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण उत्साहात

विधानपरिषद निवडणूक मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण उत्साहात

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि निर्दोषपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणामध्ये मतमोजणीची संपूर्ण कार्यपद्धती, आवश्यक खबरदारी, तांत्रिक बाबी तसेच प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतमोजणीच्या वेळी कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या प्रशिक्षण सत्राला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी बबन काकडे, मास्टर ट्रेनर्स तसेच मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नियमानुसार पार पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक राहण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.


Protected Content

Play sound