Home क्राईम रावेर पोलिस ठाण्याची सूत्रे संदीप पाटील यांच्या हाती ; अवैध धंदे आणि...

रावेर पोलिस ठाण्याची सूत्रे संदीप पाटील यांच्या हाती ; अवैध धंदे आणि गुंडगिरीविरोधात कठोर कारवाईचा इशारा

0
18


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरासह परिसरातील सामाजिक सलोखा कायम राखणे, गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे आणि पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करणे हे आपले प्रमुख प्राधान्य राहणार असल्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेतून बदली होऊन आलेले पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी नुकताच रावेर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट भूमिका मांडत कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले. मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेल्या संदीप पाटील यांनी यापूर्वी गडचिरोली, नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), नंदुरबार, जळगाव एलसीबी तसेच पिंपळगाव बसवंत येथे विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. गुन्हे तपासातील अनुभव आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आता संवेदनशील पोलिस ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेर पोलिस ठाण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट संदेश दिला आहे. गैरप्रकार, बेकायदेशीर कृत्ये आणि अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा ठाम इशारा त्यांनी दिला. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून, कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

रावेर शहरात सध्या पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नियुक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहर व परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित असून, या गुन्ह्यांची उकल करणे हे नव्या पोलिस निरीक्षकांसमोरील मोठे आव्हान असणार आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर प्रलंबित गुन्ह्यांचा तपास वेगाने होईल आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा रावेरकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.


Protected Content

Play sound