Home आरोग्य महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी 

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी 

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर अत्याधुनिक सिंगल स्टेज बीएमजी (Buccal Mucosal Graft) युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे मूत्रमार्गाच्या गंभीर समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णाला लघवीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील डोंगाव येथील ४२ वर्षीय रुग्णाला मूत्रमार्ग अरुंद होण्याचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजेच मूत्रमार्ग अरुंद होण्याचा आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर महादेव हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अत्याधुनिक सिंगल स्टेज बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीएमजी युरेथ्रोप्लास्टी ही मूत्रमार्गाच्या अरुंद झालेल्या भागाची पुनर्रचना करणारी आधुनिक आणि प्रभावी शस्त्रक्रिया पद्धत आहे. या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या तोंडाच्या आतील गालाच्या भागातील श्लेष्मल त्वचा (Buccal Mucosa) घेऊन ती मूत्रमार्गाच्या बाधित भागावर प्रत्यारोपित केली जाते. त्यामुळे मूत्रमार्गाची रुंदी वाढून लघवीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

मूत्रमार्गाच्या दीर्घकालीन अरुंदतेवर बीएमजी युरेथ्रोप्लास्टी हा प्रभावी उपचार मानला जातो. वैद्यकीय अभ्यासानुसार या शस्त्रक्रियेचा यशस्वीतेचा दर ९५ टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. शस्त्रक्रियेनंतर बहुतांश रुग्णांना लघवी करताना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि जीवनमानात सुधारणा होते. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया महादेव हॉस्पिटलच्या अनुभवी युरोलॉजी तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली. या शस्त्रक्रियेमध्ये प्रा. डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शस्त्रक्रियेदरम्यान अ‍ॅनेस्थेसिया विभागातील डॉ. रघुनाथ बारहाते व त्यांची टीम, डॉ. साक्षी सांगोळे, डॉ. सुश्रिता इराबाथिनी आणि डॉ. दर्शन सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रक्रिया पद्धती आणि रुग्णकेंद्री आरोग्यसेवा यांच्या माध्यमातून महादेव हॉस्पिटल युरोलॉजी क्षेत्रात दर्जेदार व विश्वासार्ह सेवा देत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय, परिचारिका आणि सहायक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound