
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई करत त्याला अटक केली आहे. १३ जून २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एका तरुणाकडून गावठी कट्टा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव विनोद वसंतराव पावरा (२४, रा. अमळवाडी) असे आहे.

चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विलास सुरेश पारधी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक तरुण विनापरवाना गावठी कट्टा घेऊन दुचाकीवरून लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन करून सापळा रचला.
रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास चुंचाळे गावाजवळ संशयित दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा आणि खिशात एक मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३० हजार रुपये किमतीचा स्टीलचा गावठी कट्टा (ज्यावर पक्ष्याचे चित्र कोरलेले आहे), ४५ हजार रुपये किमतीची होंडा लिओ दुचाकी (क्रमांक एम.एच. १९ सी.एस. ६१९८) आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
कारवाईनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून शस्त्रासंदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विलास पारधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात चोपडा शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



