Home Cities जळगाव SSBT सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पवृष्टीने उत्साहात स्वागत

SSBT सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पवृष्टीने उत्साहात स्वागत

0
20


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित एसएसबीटी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत आणि आनंददायी वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आणि उत्साहाने गजबजून गेला.

शाळेच्या प्रवेशोत्सवाची सुरुवात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पटनायक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शालेय प्रवासाचा पहिला दिवस आनंददायी आणि प्रेरणादायी ठरावा, यासाठी शाळेने विशेष नियोजन केले होते. सुट्ट्यांमुळे काही दिवस शांत असलेली शाळा आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा उत्साहाने भरून गेली होती. अनेक दिवसांनी मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि विविध उपक्रमांनी सजविण्यात आला होता.

शाळेतील खास तयार करण्यात आलेला सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फोटो काढून शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी जतन केल्या. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणा दिली. यावेळी सीबीएसई शाळेचे प्राचार्य कौशिक भट्टाचार्जी, उपप्राचार्य सकीना हुसेन, मुख्य प्रबंधक वाय. के. चित्ते, उपप्रबंधक एस. आर. गिरासे, जयदेव रावल, डॉ. सुधीर पाटील, भागवत पाटील, बी. एम. मोरे, प्रसिद्धी विभागाचे डॉ. अमोल वाणी, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत, विश्वस्त सौ. मंजिरी शेखावत, सुरभी शेखावत ठाकूर आणि  पृथ्वी शेखावत यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध क्षेत्रांमध्ये सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असा संदेश त्यांनी दिला. एसएसबीटी सीबीएसई स्कूलमध्ये औक्षण, पुष्पवृष्टी आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला. नव्या आशा, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेसह विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली.


Protected Content

Play sound