

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरातील सोनाली कोल्ड्रिग्जजवळ रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने प्रथम दुचाकीला आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. रावेर) येथील सरफराज समशेर तडवी हा त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-२० कार क्रमांक एमएच ०१ एआर २७०६ ही वाघोदा बु.कडून सावद्याच्या दिशेने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत आणत होता. यावेळी सावदा-वाघोदा मार्गावरून जाणाऱ्या विनानंबर स्प्लेंडर प्लस दुचाकीवरील शेख जकरीया शेख जहीर, शेख रिजवान, शेख रियाज व मुदस्सर शेख जमीर (रा. चिनावल, ता. रावेर) यांना कारने जोरदार धडक दिली.
धडक झाल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोरगाव बु. येथील आत्माराम बाबुराव ढिवरे, त्यांची पत्नी मंदाबाई ढिवरे आणि मुलगा मनोहर ढिवरे यांच्यावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आत्माराम बाबुराव ढिवरे (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोहर ढिवरे, मंदाबाई ढिवरे यांच्यासह दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मनोहर आत्माराम ढिवरे (वय २५, रा. मोरगाव बु., ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी चालक सरफराज समशेर तडवी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४-अ, १३४-ब आणि १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत. या अपघातामुळे सावदा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सावदा येथे झालेल्या या भीषण अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. निष्काळजी वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



