
सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी । रावेर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात सधन व प्रगतीशील गावांपैकी एक असणारे तांदलवाडी आता राजकीय प्रभावातील एक वर्तुळ पुर्ण करणार असून यासाठी तब्बल सत्तावीस वर्षांचा कालावधी लागला असल्याचे दिसून येत आहे.

रावेर तालुक्यातील गुर्जर समाज हा प्रचंड कर्तबगार आणि जमीनीशी जुडलेला मानला जातो. काळ्या आईवर निस्सीम प्रेम करणारा हा समाज आधी राजकीय प्रभावापासून तसा थोडा वंचितच होता. १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन त्रिशंकू राजकीय स्थितीत काँग्रेस पक्षाने याच समाजाच्या तांदलवाडीकर राजाराम गणू महाजन यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपच्या तिकिटावर तत्कालीन आमदार अरूण पांडुरंग पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर शिरीषदादा चौधरी हे रिंगणात होते. या तिरंगी लढतीत राजाराम गणू महाजन यांनी विद्यमान आमदारांना हरवत विधानसभेत एंट्री केली होती. तेव्हाच गुर्जर समाजाचा झेंडा तालुक्याच्या पटलावर रोवला गेला होता.
यानंतर राजाराम गणू महाजन यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी लाभली नाही. यथावकाश ते राजकारणातून बाजूला फेकले गेले. यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी तांदलवाडी याच गावातील रहिवासी असणाऱ्या नंदकिशोर महाजन यांना भारतीय जनता पक्षाची विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली असून सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीचा विचार करता त्यांचा विजय जवळपास निश्चीत मानला जात आहे. म्हणजेच कोणताही मोठा राजकीय उलटफेर वा चमत्कार झाला नाही तर नंदकिशोर महाजन यांची विधानपरिषदेतील ‘एंट्री’ कुणालाही रोखता येणारी नाही.
या माध्यमातून पुन्हा एकदा तांदलवाडी गावाच्या सुपुत्राला आमदारकीचा बहुमान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचमुळे गावासह परिसरात अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नंदकिशोर महाजन यांच्या माध्यमातून रावेर तालुक्याला तिसरा आमदार मिळणार असून असा सन्मान असणारा तो जिल्ह्यातील एकमेव तालुका असणार आहे. यामुळे परिसराच्या विकासाला गती येईल असा आशावाद देखील व्यक्त करण्यात येत आहे.



