अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या अमळनेर तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत अमळनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अमळनेर तालुकाध्यक्ष देविदास महादू पाटील यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनात राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरांमुळे निर्माण झालेल्या संकटाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शासनाच्या कर्जमाफी योजनेतील काही अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. योजनेनुसार सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीतील कोणत्याही दोन वर्षांमध्ये पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद आहे. मात्र, या लाभासाठी संबंधित शेतकऱ्याने सन २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांचे पीक कर्ज भरलेले असणे आवश्यक असल्याची अट असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या अटींमुळे शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांसह पुढील दोन वर्षांचे असे एकूण चार वर्षांचे कर्ज भरण्याची अडचण निर्माण होणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अट अन्यायकारक असून शासनाने यामध्ये तातडीने बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने विविध संकटांना सामोरे जात आहेत. नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात झालेली वाढ, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कर्जमाफी योजनेतील अटी शिथिल कराव्यात तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हाउपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, दिव्यांगसेल जिल्हाध्यक्ष शांताराम कोळी, तालुका उपाध्यक्ष वासुदेव पाटील, मनोहर पाटील, सरचिटणीस चिंधू वानखेडे, जग्गनाथ पाटील, दीपक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



