नवी दिल्ली-वृत्तसेवा । भारतीय नेमबाजी क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित प्रशिक्षक जसपाल राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून नेमबाजी विश्वाने एक कुशल प्रशिक्षक, प्रेरणादायी खेळाडू आणि मार्गदर्शक गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नेमबाजी संघाच्या अलीकडील यशस्वी मोहिमेनंतर जसपाल राणा म्युनिकहून भारतात परतत होते. प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरातील क्रीडाप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

जसपाल राणा यांनी भारतीय नेमबाजीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण आठ पदके जिंकून देशाचा गौरव वाढवला. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 1994 च्या हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावत त्यांनी आपल्या शानदार कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून भारतीय नेमबाजीला नवे शिखर गाठण्यास मदत केली. 2012 पासून ज्युनियर पिस्तूल प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जसपाल राणा यांनी अनेक युवा नेमबाज घडवले. सौरभ चौधरी, अनिश भानवाला, चिंकी यादव यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंना त्यांनी घडवले, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिलाही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांच्या प्रशिक्षणाखाली मनू भाकरने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकत इतिहास रचला होता. कठोर शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि खेळाडूंच्या मानसिक तयारीवर भर देणारी त्यांची प्रशिक्षणशैली विशेष प्रसिद्ध होती. त्यामुळे भारतीय नेमबाजीच्या नव्या पिढीच्या यशामागे त्यांचे मोठे योगदान मानले जाते. फेब्रुवारी 2025 मध्ये एनआरएआयने त्यांची 25 मीटर पिस्तूल प्रकारासाठी उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या म्युनिक विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली होती. या यशामुळे भारतीय नेमबाजीचा जागतिक स्तरावरील दबदबा आणखी वाढला होता.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2020 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला होता. उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक खेळाडूंना जागतिक दर्जाचे यश मिळवून देत भारतीय क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “जसपाल राणा हे केवळ उत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षक नव्हते, तर ते अत्यंत साधे, नम्र आणि दयाळू व्यक्तिमत्त्व होते. भारतात नेमबाजी या खेळाला लोकप्रिय करण्यात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.”



