Home क्राईम डंपरच्या धडकेत वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी पेटवला डंपर

डंपरच्या धडकेत वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी पेटवला डंपर

0
4


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा गावाजवळील पिंप्रीसेकम शिवार रस्त्यावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीला मागे घेत असलेल्या डंपरखाली चिरडले जाऊन आजोबाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची नात सुदैवाने बालबाल बचावली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होऊन संतप्त ग्रामस्थांनी संबंधित डंपर पेटवून दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, तपत कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (वय ५५) हे आपल्या चार वर्षांच्या नाती परीसोबत पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून एम.एच. १९ बी ९३२० क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत होते. त्याच वेळी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असलेला एम.एच. १९ ई.यू. ३७३७ क्रमांकाचा डंपर अरुंद रस्त्यावर मागे घेत असताना दुचाकीला जोरदार धडक बसली.

या धडकेत आनंदा पाटील हे डंपरखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या बाजूला बसलेली लहान नात परी ही प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डंपरखाली अडकलेली दुचाकी तसेच मृतदेह बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर आनंदा पाटील यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित डंपरला आग लावून पेटवून दिला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound