
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिपनगर येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निळे निशाण कामगार संघटनेचे प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर यांनी ३ जूनपासून अन्नत्याग अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागाने त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. मात्र त्यानंतर आरोग्य विभागाने उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

उपोषणाच्या पाचव्या दिवशी आनंदभाऊ बाविस्कर यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
शासन-प्रशासनाच्या निष्काळजी भूमिकेचा निषेध करत संघटनेने ८ जून रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून पुढील आंदोलनात्मक भूमिका निश्चित केली जाणार आहे. संघटनेच्या पुढील निर्णयाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.



