Home प्रशासन सांगवी खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेत नशामुक्तीचा जागर ; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त भारताची शपथ

सांगवी खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेत नशामुक्तीचा जागर ; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त भारताची शपथ

0
14


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारत सरकारच्या नशामुक्ती अभियानांतर्गत ‘नशामुक्त कुटुंब, नशामुक्त भारत’ या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांचे व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन व्हावे, तसेच लहान वयातच व्यसनमुक्तीचा संदेश रुजावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा संघटक डॉ. दयाघन राणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते मयूर महाजन यांचीही यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी प्रमुख वक्ते डॉ. दयाघन राणे यांचा परिचय करून दिला. सांगवी खुर्द गावचे शिक्षणप्रेमी नागरिक दिगंबर कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. दयाघन राणे यांचे स्वागत केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते मयूर महाजन यांचा सत्कार उपशिक्षिका रंजना सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दारू, सिगारेट, तंबाखू आणि अन्य व्यसनांचे शरीरावर तसेच कुटुंबावर होणारे दुष्परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले. विविध जनजागृतीपर पोस्टर्सचा वापर करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. व्यसनांची सुरुवात अनेकदा लहान सवयींपासून होते आणि पुढे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. व्यसनांपासून स्वतः दूर राहण्यासोबतच कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

व्याख्यानानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच उपस्थितांनी ‘व्यसनमुक्त भारत’ घडविण्याची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका अरुणा तायडे, शाळेच्या उपाध्यक्षा काजल वाघ, निशा अडकमोल, वैशाली कोळी, वंदना पाटील, अंगणवाडी मदतनीस सिंधुताई पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन शाळेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले.


Protected Content

Play sound