

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व सातोड परिसरात कथित अवैधरित्या ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. महावितरणची अधिकृत परवानगी नसताना एका ठेकेदाराने एकाच दिवशी दोन ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविल्याचा आरोप होत असताना, नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर हे ट्रान्सफॉर्मर तातडीने हटविण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसर तसेच अंतुर्ली भागात संशयास्पद पद्धतीने ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले होते. या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक परवानगी किंवा महावितरणच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी आणि नागरिकांकडून चौकशीची मागणी होत असतानाही संबंधित ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती, असा आरोप आहे.
दरम्यान, प्रकरणाची माहिती सार्वजनिक होताच आणि चौकशीची मागणी तीव्र झाल्यानंतर संबंधित दोन्ही ट्रान्सफॉर्मर घाईघाईने हटविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही महावितरण अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरच हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू असून त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांनी याप्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बसविण्याची प्रक्रिया अधिकृत होती, तर ते काढण्याची गरज का भासली? आणि जर ती अनधिकृत होती, तर संबंधित काम सुरू असताना महावितरण प्रशासनाने कोणती भूमिका घेतली होती? तसेच संबंधित ठेकेदाराला हे काम करण्याचे धाडस नेमके कोणाच्या पाठबळावर मिळाले, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.
या प्रकरणात केवळ ठेकेदारच नव्हे तर त्याला संरक्षण देणारे किंवा दुर्लक्ष करणारे अधिकारी यांच्याही भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. अवैध कामे सुरू असताना प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप का केला नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, तसेच आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महावितरण प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.



