
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मुक्ताईनगर नगर शाखेच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संत मुक्ताबाई महाविद्यालयातील ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. इंद्रसिंग पाटील होते. तर अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. गिरीष कुलकर्णी आणि कार्यक्रम प्रमुख गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रभक्तीची जाणीव जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षणासोबतच समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. इंद्रसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणीच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असे सांगत भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अभाविपचे जळगाव विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, दुर्गेश जाधव, प्रवीण राठोड यांच्यासह पालक, शिक्षक आणि तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनिता काळे, सानिका सोनार, दीक्षा तेडले, गौरी दैवे, योगेश्वर सिरसे, मानव मिस्त्री आणि सुमित माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.



