
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी-पादुकांचे यावल शहरात ७ जून रोजी आगमन होणार असून भाविकांना दर्शन व सेवाभावी उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या पालखी-पादुका परिक्रमेअंतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

स्वामी भक्तांना त्यांच्या गावातच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन व्हावे, तसेच वृद्ध, महिला आणि दूरवर प्रवास करणे शक्य नसलेल्या भाविकांना स्वामींच्या कृपेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही परिक्रमा आयोजित करण्यात येते. अक्कलकोट येथे प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या भक्तांसाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा मानला जातो.
पालखीचे यावल शहरात आगमन ७ जून रोजी होणार असून सायंकाळी ५.३० वाजता धनश्री टॉकीज, बोरावल गेट येथे मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. बोरावल गेट, गवत बाजार, अपना बाजार, महाजन टी डेपो, चावडी मार्ग आणि कोर्ट रोड मार्गे ही मिरवणूक शिवाजीनगर परिसरात पोहोचणार आहे.
शिवाजीनगर येथील प्रा. मुकेश येवले यांच्या निवासस्थानी सायंकाळी ७ वाजता महापूजा, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून पालखीचा मुक्काम तेथेच राहणार आहे. विशेष म्हणजे, प्रा. मुकेश येवले व त्यांच्या परिवारातर्फे गेल्या सलग १७ वर्षांपासून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
८ जून रोजी सकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर पालखीचे पुढील प्रवासासाठी फैजपूरकडे प्रस्थान होणार आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन घेऊन आध्यात्मिक लाभ मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. मुकेश येवले व छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.



