Home Cities रावेर सावद्यात पत्रकारांनी भर उन्हात श्रमदान करत हटवल्या महामार्गावरील धोकादायक फांद्या, रस्ता केला...

सावद्यात पत्रकारांनी भर उन्हात श्रमदान करत हटवल्या महामार्गावरील धोकादायक फांद्या, रस्ता केला मोकळा

0
8


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोठ्या वाघोदा बुद्रुक ते वडगाव या महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे एका विशाल झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून थेट रस्त्यावर लोंबकळत होत्या. या लोंबकळणाऱ्या फांद्यांमुळे महामार्गावरील अर्धा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. परिणामी, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून आणि झाडाच्या फांद्यांचा विळखा चुकवत अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत होता. ही गंभीर आणि अपघातप्रवण परिस्थिती समोर येताच स्थानिक पत्रकारांनी दाखवलेली सामाजिक सतर्कता आणि श्रमदानामुळे एक मोठा संभाव्य अपघात टळला आहे.

सदर जीवघेणा प्रकार मोठा वाघोदा येथील वृत्तपत्र प्रतिनिधी कमलाकर माळी आणि पत्रकार तथा माजी सरपंच मुबारक उर्फ राजू तडवी यांच्या निदर्शनास आला. महामार्गावरील परिस्थिती किती गंभीर आहे आणि यामुळे केव्हाही मोठा अपघात घडू शकतो, याचे गांभीर्य दोन्ही माध्यम प्रतिनिधींनी ओळखले. प्रशासकीय मदतीची किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत न बघता, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःहून पुढाकार घेण्याचे ठरवले. भर उन्हाची पर्वा न करता, हे दोन्ही पत्रकार झाडाच्या तुटलेल्या फांद्या तोडण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य सोबत घेऊन थेट महामार्गावर पोहोचले.

दोन्ही पत्रकारांनी भर उन्हात तब्बल तासभर अथक परिश्रम घेतले. अत्यंत धाडसाने झाडावर चढून त्यांनी रस्त्यावर लोंबकळणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या त्या अवाढव्य फांद्या स्वतः तोडल्या आणि बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा केला. पत्रकारांचे हे कर्तव्यनिष्ठ आणि अनोखे सामाजिक रूप पाहून महामार्गावरून ये-जा करणाऱ्या अनेक वाहनधारकांनी थांबून त्यांचे मनापासून आभार मानले. पत्रकारांच्या या कौतुकास्पद मोहिमेत त्यांना जवळील गावातील शेतकरी प्रकाश हरी चौधरी, त्यांचा मुलगा केतन प्रकाश चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते मजहर शरीफ तडवी यांनी देखील सक्रिय हातभार लावत मोलाची मदत केली.

या पत्रकारांनी आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमागे एक अत्यंत वेदनादायी पार्श्वभूमी आणि घटनेचे गांभीर्य होते. महिनाभरापूर्वीच निंभोरा ते मोठा वाघोदा बुद्रुक गावाजवळ रस्त्यालगतचे एक मोठे वृक्ष अंगावर कोसळल्याने रोझोदा येथील एका नवयुवक तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या भीषण अपघाताशिवाय, सावदा-रावेर रस्त्यावर यापूर्वीही अनेकदा झाडे आणि त्यांच्या अवजड फांद्या अंगावर पडून निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. हीच जुनी दुर्घटना आणि संभाव्य धोक्याची टांगती तलवार लक्षात घेऊन पत्रकार कमलाकर माळी, मुबारक अली खाँ तडवी, प्रकाश चौधरी, मजहर तडवी आणि केतन चौधरी यांनी तात्काळ श्रमदान करून रस्ता सुरक्षित केला.


Protected Content

Play sound