
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मयत खातेदाराच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक आधार देण्यात आला. या घटनेमुळे बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अशा योजना किती महत्त्वाच्या आहेत हे अधोरेखित झाले आहे.

यावल येथील Maharashtra Gramin Bank शाखेत खाते उघडलेल्या अरुण नारायण न्हावी (भुसावळ) यांनी बँकेच्या विविध सेवा जसे की एटीएम, नेट बँकिंग, अटल पेन्शन योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याबाबत संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी अत्यल्प वार्षिक प्रीमियम भरून या विमा योजनेचा लाभ घेतला होता.
काही कालावधीनंतर त्यांची तब्येत खालावली आणि दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. या दु:खद प्रसंगानंतर त्यांच्या वारसदार सुरेखा अरुण न्हावी यांनी आवश्यक कागदपत्रे यावल शाखेत सादर करून विमा दावा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर काही दिवसांतच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २ लाख रुपयांचा दावा मंजूर करण्यात आला.
या रकमेचा धनादेश क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी आणि शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे यांच्या हस्ते वारसदार सुरेखा अरुण न्हावी तसेच त्यांचे नातलग रजनी बनाईत यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या योजनेमुळे मिळणाऱ्या सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला सहाय्यक व्यवस्थापक सौ. वैशाली नगराळे, जानवी खोडे, रोखपाल चेतनसिंह राजपूत तसेच मेसेंजर महेश दत्तात्रय खाचणे आणि निखिल बारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली.
यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी खातेदारांना आवाहन करताना सांगितले की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम अत्यंत अल्प असून केवळ ४३६ रुपये आहे. तसेच सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियमही अत्यल्प असल्याने प्रत्येक खातेदाराने या योजनांचा लाभ घ्यावा, जेणेकरून कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळू शकेल.
बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कर्ज सुविधा जसे की कार लोन, हाऊसिंग लोन, गोल्ड लोन यासह अनेक आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी यावल शाखेला भेट द्यावी, असे आवाहन शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे यांनी केले.



