भोपाळ वृत्तसंस्था । भाजपचा भोपाळ हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिनेत्री करीना कपूर यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असे वाटू लागले आहे. अशी मागणीच पक्षाकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातील कुतुहल चाळवले आहे.
यशाची हमखास खात्री
सेलिब्रिटीजला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने हमखास यश मिळते हे आधीच सिध्द झाले आहे. यामुळे भारतीय राजकारणात अनेक वलयांकीत व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. यातच एखाद्या मातब्बर नेत्याला पराभूत करण्यासाठी अथवा कोणत्याही पक्षाची हमखास जागा हिसकावण्यासाठी लोकप्रिय चेहरा उपयोगात येत असतो. अमिताभ बच्चन यांनी हेमवतीनंदन बहुगुणा तर गोविंदाने राम नाईक यांचा केलेला पराभव ही याची उत्तम उदाहरणे आहेत. याच प्रकारे आता भोपाळ लोकसभेची जागा भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिनेत्री करीना कपूर हिने काँग्रेसकडून निवडणूक लढवावी असे वाटू लागले आहे.
भोपाळशी घनिष्ठ संबंध
करिनाचे सासर यांचा घनिष्ठ संबंध आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येतात. यामुळे येथे त्यांचा चांगलाच परिचय आहे. यातच करीना ही तुफान लोकप्रियदेखील आहे. यामुळे भोपाळ येथून तिने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची मागणी करण्यात येत आहे. करिनाच्या करिश्म्यामुळे भाजपकडे असणारी ही लोकसभेची जागा सहजपणे जिंकता येणार असल्याचे गणित मांडण्यात आले आहे.
प्रतिक्रिया नाही
करिना कपूरने भोपाळ लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढावी अशी मागणी तेथील काँग्रेस नगरसेवकांनी आपल्या पक्षाकडे केली आहे. याबाबतचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी करीना कपूरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.