

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात जनगणना २०२६चे काम निर्धारित मुदतीत, अचूक आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व चार्ज अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. जनगणनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित कामकाज गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या जनगणना कामकाजाची सद्यस्थिती, प्रगती आणि विविध स्तरांवरील अंमलबजावणीची माहिती घेण्यात आली. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जनगणनेचे उर्वरित काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला. प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. कामाच्या गुणवत्तेसह अचूकतेलाही प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (डीआयओ), तहसीलदार (सर्वसाधारण) यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामकाज ४ जून २०२६ पर्यंत अनिवार्यपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असून त्याला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने जनगणना प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून, निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.



