
बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील मौजे वराड बुद्रुक येथे गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून तब्बल ६० शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. तहसील प्रशासनाच्या पुढाकाराने आणि प्रत्यक्ष उपस्थितीत हा अनेक वर्षांचा वाद मिटवण्यात यश आले. शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वराड बुद्रुक परिसरातील शेतकरी शेतरस्त्याच्या समस्येमुळे अडचणीत होते. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीची कामे, मालाची वाहतूक तसेच दैनंदिन कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होत होता. या प्रश्नासाठी शेतकरी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन पाठपुरावा करत होते. मात्र दीर्घकाळ तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत होती. अखेर तहसीलदार सपकाळे यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून प्रत्यक्ष पाहणी केली आणि सर्व संबंधितांना एकत्र आणत प्रश्न सोडवण्याचा पुढाकार घेतला.
तहसीलदार सपकाळे यांनी शेतकरी आणि रस्त्याबाबत आक्षेप असलेल्या संबंधित शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करत समन्वय साधला. कोणताही वाद किंवा तणाव न होता चर्चेच्या माध्यमातून रस्ता मोकळा करून देण्यात आला. प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून अडकलेला प्रश्न शांततेत मार्गी लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रक्रियेत शेतकरी सोनू निना बेलदार यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. इतर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी आपल्या शेतातून रस्ता उपलब्ध करून दिला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला. ग्रामपंचायतीचे सरपंच अजयसिंग पाटील यांनीही समन्वयाची भूमिका घेत प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य केले. गावाच्या विकासासाठी एकत्र येत प्रश्न सोडवण्याचा आदर्श या निमित्ताने पाहायला मिळाला.
यावेळी गावातील अरुण मोझे, शुभम पाटील, बदलखा वंजारी, देविदास आवटे, सुभाष मोझे, संभाजी पाटील यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक चौधरी, तलाठी कल्पना पगरुत, सर्कल बडगुजर मॅडम, मोजणी अधिकारी, कोतवाल आणि ग्रामस्थही उपस्थित होते. प्रशासन आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला.



