Home राजकीय आ. अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश ; रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुन्हा पूर्ववत...

आ. अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश ; रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुन्हा पूर्ववत ८ तास वीजपुरवठा


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून सावदा महावितरण कंपनीने कृषी पंपांच्या वीजपुरवठ्यात केलेली कपात अखेर मागे घेतली आहे. आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांना पुन्हा पूर्ववत सलग ८ तास वीजपुरवठा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात आणि शेतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मोठ्या अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणकडून कृषी पंपासाठी दिला जाणारा वीजपुरवठा ८ तासांवरून ६ तासांवर आणण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. या निर्णयामुळे रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. विशेषतः जळगाव जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून केळी उत्पादक पट्ट्यातील हजारो हेक्टरवरील पिकाला नियमित पाण्याची अत्यंत गरज आहे. अशा वेळी वीजपुरवठ्यात कपात झाल्याने शेतीपंप बंद राहण्याची भीती होती आणि त्यामुळे केळीच्या उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

रावेर मतदारसंघातील ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी थेट मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे सलग आणि नियमित ८ तास वीजपुरवठा मिळावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी प्रशासनाला दिला.

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. मुख्य अभियंत्यांनी या तक्रारीची दखल घेत दूरध्वनीद्वारे पूर्वीप्रमाणे ८ तास वीजपुरवठा सुरू राहील, असे आश्वासन दिले. यासाठी वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येणार असून पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयानंतर रावेर मतदारसंघातील शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानात केळीसह अन्य पिकांसाठी पाणी उपलब्ध राहणे अत्यंत गरजेचे असताना प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound