
पुणे – वृत्तसेवा । नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते, मात्र यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. देशभरात वाढणारे इंधनाचे दर, आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदाच्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे शालेय साहित्याच्या किमती तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना पालकांना यंदा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये वह्या, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बहुतांश वस्तूंच्या किमती वाढल्याने अनेक पालकांची चिंता वाढली आहे. शिक्षण ही मुलांची मूलभूत गरज असल्याने किंमत वाढली असली तरी खरेदी टाळणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबांचे मासिक बजेट विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत कागदाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि पल्पच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम वह्या आणि पुस्तकांच्या किमतींवर झाला आहे. याशिवाय देशातील डिझेल आणि पेट्रोल दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्चही दुपटीने वाढला आहे. त्यामुळे वह्या आणि पुस्तकांच्या किरकोळ विक्री दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
केवळ वह्या-पुस्तकांपुरतेच हे चित्र मर्यादित नाही. शाळांमध्ये वापरले जाणारे पूरक साहित्य, गाईड, वर्कबुक, प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या वस्तू आणि होमवर्कसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अनेक वस्तूंमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त दरवाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालकांना एका विद्यार्थ्यामागे लागणारा खर्च यंदा अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान शालेय गणवेशाच्या किमतींनीही पालकांची चिंता वाढवली आहे. गणवेशासाठी लागणाऱ्या कापडाच्या किमती वाढल्यामुळे आणि शिवणकाम करणाऱ्या कारागिरांच्या मजुरीत वाढ झाल्याने गणवेशाचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. शाळेचे बूट, मोजे, बॅग आणि इतर आवश्यक वस्तूंचे दरही वाढल्याने शालेय खर्चाचा आकडा अधिक वाढत आहे.
सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर वाढले असून त्याचा फटका आधीच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अशातच आता मुलांच्या शिक्षणाशी संबंधित खर्चातही मोठी वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक पालकांनी सरकारने शालेय साहित्याच्या वाढत्या किमतींकडे तातडीने लक्ष देऊन दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



